श्लोक निरूपण, “अवजानंति मां मूढा”

अवजानंति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् | परं भावमजानंतो मम भूतमहेश्वरम् ||

– श्रीमद भगवत गीता ९.११

 

इथे भगवंत म्हणत आहेत, “माझ्या पारमार्थिक स्वरुपाला न जाणणारे लोक सर्व भूतांचा (भवति इति भूत:) ईश्वर असलेल्या व मनुष्यशरीराच्या आश्रयाला न राहणाऱ्या मला, काही करणारा (कर्ता), भोग घेणारा (भोक्ता), व्यक्त मानून माझी अवज्ञा करतात, मला कमी लेखतात.”

 

माऊली सुद्धा यांवर लिहितात त्यांच्या अतिशय सुरेख अशा वाणीत. त्यांनी शुद्ध मराठीमध्ये हे सगळं इतकं आधी शुद्ध स्वच्छ सांगून ठेवलंय, की कमाल वाटते. मराठीत असल्याने कळायला सोपी, आणि या ओव्या तर काय, अगदी भिडतात जाऊन आतमध्ये. ही मराठी भाषाच अशी गोड आहे की त्यांत सांगितलेले परमार्थाचे सैद्धांतिक निरस विषयसुद्धा किती गोड होतात बघा,

 

जैसा नक्षत्राचिया आभासा | साठी घातु जाला तया हंसा | माजी रत्नबुद्धीचिया आशा | रिगोनिया ||

– ज्ञानेश्वरी ९.१४६

 

अर्थात, जसे पाण्य़ांत पाडलेल्या तारकांच्या प्रतिबिंबाकरतां त्या हंसांचा नाश होतो, ते त्या प्रतिबिंबांनाच रत्ने आहेत हे खाण्याच्या आशेने पाण्यात शिरून खडकांवर चोच आपटून घेतात, तसे

तैसे अश्रवणा श्रोत्र | मज अचक्षूसी नेत्र | अगोत्रा गोत्र | अरुपा रुपा ||

– ज्ञानेश्वरी ९.१६०

 

अर्थात, कान नसलेल्या मला कान, डोळे नसताना डोळे, अगोत्रा गोत्र आणि रुपरहिताला रुप आहे अशी कल्पना करतात. मुर्तीमध्ये देव येतो असे म्हणणे योग्य, मुर्ती म्हणजेच देव आहे असे नाही, कारण याबाबत संत काय म्हणतात ते आपण बघितले पाहिजे:

 

मज सहजातें करिती | स्वयंभातें प्रतिष्ठीती | निरंतराते आव्हानिती | विसर्जिती गा ||

– ज्ञानेश्वरी ९.१६३

 

अर्थात, मी सहज नित्यसिद्ध असतानासुद्धा माझी मूर्ति घडवतात, मी स्वयंभू असताना माझी प्रतिष्ठा करतात, मी सर्वत्र सर्वकाळ असताना मला “तो यावा, येतो” आणि “गेला, जातो” असे सरळ सांगतात.

 

मी आत्मा एक चराचरी | म्हणती एकाचा कैपक्ष करी | आणि कोपोनी एकातें मारी | हेंचि रुढविती ||

 

अर्थात, चराचरांत फक्त मीच एक असताना मी एकाला भक्त समजतो दुसऱ्याला अभक्त समजतो, एखाद्याचा कैवार घेतो आणि दुसऱ्याला रागावून मारतो, त्याचे वाईट करतो अशा कथा सांगतात, आणि वर हेच माझे चरित्र म्हणून सांगत राहतात.

 

जव आकार एक पुढां देखती | तंव हा देव म्हणून भजती | मग तोचि बिघडलिया टाकीती | नाही म्हणूनी ||

– ज्ञानेश्वरी १.१९४

 

अर्थात, जेव्हा एखाद्या मूर्तीचा आकार पाहतात तेव्हां त्यात देव आहे असे मानून त्याची पूजा करतात. पण तीच मूर्ती भंग पावली तर त्यांत आता देव नाही म्हणून टाकून देतात, विसर्जन करून टाकतात. याच ओवीचा अजून एक अर्थ आहे. एखादा सुंदर आकार पुढे पाहीला, किंवा एखादा खूप भक्तीबद्दल लिहीत असला (अगदी एकदम ज्ञानेश्वरीची उदाहरणं देऊन वगैरे… माझ्यासारखा आनंदी) तर त्याला “अरे वा, तुम्ही खूप भक्त दिसता, नक्कीच देवाचा तुमच्यात वास आहे” वगैरे म्हणतात, स्तुती करतात. मला पण खूप बरं वाटतं. एवढं लिहिल्याचं साफल्य झालं वाटतं, आणि अशीच फजिती करून घेऊन आपण ज्ञानेश्वरांनी इतक्या जीव तोडून सांगितलेल्या ज्ञानाकडे निव्वळ दुर्लक्ष करतो. हेच कुणी बेंगरूळ रूप समोर आलं.. किंवा समजा एखाद्या अमावस्येच्या रात्री माळावर फिरताना वगैरे काही मध्येच दिसल्यासारखं वाटलं, कि लगेच देवा तू ये, याला घालव आणि आम्ही इतके चांगले आहोत, इतके सज्जन आहोत, इतके धुतल्या तांदळासारखे शुद्ध आहोत, त्यांचे रक्षण कर असं सगळं आठवतो. मग तिथे “ईश्वर: सर्वभूतानां ह्रद्देशेर्जुन तिष्ठति” वगैरे काही सुचत नाही.

 

मी” ची जाणीव आहे तोवर द्वैतापासून कुठेही सुटका नाही. दृश्य, दर्शन आणि द्रष्टा. क्रिया, कर्म आणि कर्ता, भोग्य, भोग आणि भोक्ता हे त्रिपुटीचे खेळ समाधी अवस्थेत नसेन तर चालू राहणारच आहेत. समाधीत असतानाचा अनुभव तुकोबा सांगतात तसा “आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे” असा आहे, म्हणजे तिथे मी ही नाही आणि तो ही नाही. आहे तो अवघा सत्चिदानंद.

 

जर असं असेल, तर अद्वैत आणि द्वैताच्या गप्पा मारुन काय होणार? तुकोबा जगद्गुरू याचसाठी आहेत. त्यांच्या गाथेत भक्ति तितकीच ओतप्रोत भरलेली आहे जितके अद्वैत तत्वज्ञान आहे. आणि त्यांत वाद कुठेही नाही.

 

दुजे खंडे तरी | उरला तो अवघा हरि | आपणाबाहेरी | न लगे ठाव धुंडावा ||१||

इतुलें जाणावया जाणा | कोड तरी मनें मना | पारधीच्या खुणा | जाणतेणेचि साधाव्या ||२||

देह आधीं काय खरा | देह संबंधपसारा | बुजगावणॆं चोरा | रक्षणसें भासतें ||३||

तुका करी जागा | नको वा सपूं वाउगा | आहेसि तूं अंगा | अंगी डोळे उघडी ||४||

– तुकाराम गाथा, निवडक अभंग संग्रह १९

 

ज्ञानाने मायेचा, द्वैताचा निरास झाला की जे काही राहते तो एक हरीच आहे. आपल्याला आत्म्याहून अन्यत्र कुठेही त्याला शोधावे लागत नाही. म्हणून तुकोबाराय अज्ञानी नराला जागे करतात आणि सांगतात की तू निष्कारण दु:खी होऊ नकोस कारण, “आहेसी तू अंगा”. तुझे स्वरूपच ते आहे. “ते तू आहेस” त्याच्याविषयी तू आपली ज्ञानदृष्टी उघडून पहा.

 

ही एक जाणिव किंवा एक खात्री, विश्वास, श्रद्धा असलीच पाहीजे, की या सर्वांमागे कोण आहे, माझे स्वरूप काय आहे? तर ते स्वरूप, गोविंद हे सर्वांचे साक्षी आहे. हे अनुसंधान असलं की माझं काम झालं.

 

“अवजानंति” या श्लोकाचा नीट विचार केल्यावरच तो अर्थ लक्षात येईल. मी जेव्हा मनुष्य शरीररुपाला “येतो” असं सरळ भगवान म्हणतायत. म्हणजे ते त्यांचं मूळ रूप नाहीये, हे देखील ते तिथे उद्धृत करत आहेत. असं असेल तर आपल्याला ते मूलस्वरूप जाणून घेणे आवश्यक ठरते. त्यांच्या त्या शरीरालाच, त्या रुपालाच त्यांचे परमस्वरूप जे मानतात त्यांच्याविषयी ते इथे बोलत आहेत. मग असं असेल तर त्यांचं चित्र कधी म्हातारं नसतं वगैरे गौण गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज पडत नाही.

 

मूर्ती ही अतिशय महत्वाची आहे हे नक्की. परमार्थाच्या मार्गावरचे हे टप्पे पार करायलाच लागतात. त्यातलां पहिला टप्पा आहे चित्ताचे स्थैर्य. आणि ती स्थिरता हरीणाच्या ठिकाणी असायला हरकत काहीच नाहीये, पण त्याचा फायदा काय? “मोठ्ठे शून्य” चित्तवृत्ती ही हरीच्याच चरणांवर स्थिर झाली पाहीजे. तरच त्यांतून जे मिळायचं आहे ते मिळेल.

 

पण त्याचवेळी तुकोबा म्हणतात “उपाधीवेगळे तुम्ही निर्विकार| कांहीच संसार तुम्हा नाही|” इथे उपाधी म्हणजे काय? तर उपाधीचा स्पष्ट अर्थ आहे नसती कटकट. हे शरीर ही आत्म्याची उपाधी आहे. अशी काहीच उपाधी विठ्ठलाला नाही. कशी? तर देवाची आपल्याला ठाऊक असलेली रुपे चार आहेत. १. निरुपाधीक ब्रह्म २. सोपाधिक ईश्वर ३. रामकृष्णरुपाने झालेले अवतार आणि ४. मंदिरातील मूर्ती.

 

यातल्या कुणाच्या चरणांवर आपली चित्तवृत्ति स्थिर करायची? ब्रह्माच्या करावी तर ते शक्यच नाही, कारण ब्रह्म हे निर्गुण, निराकार, निरवयव आहे. ती ईश्वराच्या चरणीही करता येणार नाही, कारण तो सगुण असला तरी निराकार आहे. मग अवतारांच्या चरणी? तर अवतार तर येऊन गेलेले आहेत. आत्ता उपलब्ध कोण आहे? तर ती त्या ईश्वराची मंदिरातली मूर्ती आहे. आणि तिच्यात देखील परब्रह्म तितकेच आहे जितके बाकी दुसरीकडे कुठेही असेल. पण हो, ती मूर्ती विशेष आहे कारण तिचा निर्देश परमसत्याकडे आहे. तिचा निर्देश परब्रह्माच्या स्वरुपाकडे आहे.

 

अशा साधनाला, कि ज्यायोगे निर्गुण निराकार असलेल्या परब्रह्माचा निर्देश शक्य होतो, त्याचे ध्यान शक्य होते, ईश्वराची उपासना शक्य होते, अशा साधनाला आलंबन असे म्हणतात. म्हणजे ज्याला घट्ट धरून एखाद्या निश्चित स्थळी पोहोचायचे असते, ते आलंबन. भगवंताचे नाम, त्याचे रुप ही आलंबने आहेत (त्यामुळे कुणी “मी माधुरी दीक्षितची मूर्ती करून पूजा करू का” असे मुद्दे कृपा करून उपस्थित करू नयेत) त्याचसाठी तुकोबांचा हा पहिलाच अभंग आहे (समचरण दृष्टी..).. कि माझी वृत्ती तुझ्या पायाशी रहावी. पण तेच तुकोबा पुढे म्हणतात

 

केला मातीचा पशुपति | परि मातीसि काय म्हणती | शिवपूजा शिवासी पावे | माती मातीमाजी सामावे ||१||

तैसे पूजिती आम्हां संत | पूजा घेतो भगवंत | आम्ही किंकर संतांचे दास | संतपदवी नको आम्हांस ||धृ.||

केला पाषाणाचा विष्णु | परी पाषाण नव्हे विष्णु | विष्णुपूजा विष्णुसि अर्पे | पाषाण राहे पाषाणरूपें ||२||

केली कांशाची जगदंबा | परि कांसें नव्हे अंबा | पूजा अंबेची अंबेला घेणें | कांसें राहे कांसेंपणें ||३||

ब्रम्हानंद पूर्णामाजी | तुका म्हणे केली कांजी | ज्याची पूजा त्याणें चि घेणें| आम्ही पाषाणरूप राहणें ||४||

– तुकाराम गाथा अभंग २६२

 

अर्थात, मातीचे शिवलिंग करून त्याची पूज्या केलि ती शंकराला पावते, शिवलिंगाचे विसर्जन केल्यानंतर माती पुन्हा मातीत मिसळते. त्याचक्षणि तिचं महत्त्व संपते, तसे लोक भगवंताची पूजा करण्यासाठी संतांची पूजा करतात, ती संतहृदयातील भगवंतास पावते, आम्ही संतांचे सेवक असल्यामुळे संतपदविचा मोह आम्हाला नाही. दगडी विष्णुमूर्तिचि पूजा केलि असता ती विष्णुला पावते, दगड दगडच राहतो. काशाचि जगदंबेचि मूर्ति केली आणि तिची पूजा केली तर ती जगदंबेला पावते, कासे हां धातु धातुच राहतो. तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे (संतांचा, साधकांचा) भक्तिभाव हा पुजे प्रमाणे एक माध्यम आहे, त्याद्वारे सामान्य मनुष्य भक्ति करतो आणि अंती ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो.

 

पूजा करा, अवश्य करा, त्यानेच चित्तशुद्धी होणार आहे, पण त्यां मूर्तीतले शिवतत्व ओळखा, कृष्णतत्व ओळखा. आणि इथे त्या मूर्तीला दगड म्हणण्याचाही उद्देश नाहीये, पण साध्या दगडांतही देव बघण्याची इच्छा आहे. असो. या सर्वांपैकी एकही मत माझे नाहीये. कारण परमार्थात “माझ्या”, कुणा ‘क्ष’ व्यक्तीच्या मताला काही अर्थ नाही. ही सर्व मतं किंवा हे सिद्धांत संतांच्या आणि संततुल्य अशा व्यक्तींच्या स्वानुभवावरून घेतलेले आहेत, सांगण्यावरून घेतलेले आहेत. आता मग ते मार्ग तुमच्या मार्गांपेक्षा वेगळे असले तरी शेवटी जे परमतत्व आहे त्या तत्वापर्यंत पोहोचण्याशी आपले कर्तव्य आहे. माऊली म्हणतात – ठीक आहे, प्रत्येक जण काही पटकन त्या परमतत्वाचं स्वरुप आहे तसं समजावून, अनुभवून घेऊ शकत नाही,

 

देखें उत्प्लवनासरिसा | पक्षी फळासी झोंबे जैसा | सांगे नर केवी तैसा | पावे वेगा? ||

– ज्ञानेश्वरी ३.४१

 

अर्थात, एखाद्या झाडाच्या शेंड्याला असलेले फळ, पक्षी जसा उडताक्षणी जाऊन पकडतो, त्याला झोंबतो. तसा माणूस तिथे तितक्या पटकन पोहोचू शकेल का? तर नाही. मग? मग ठीक आहे. ज्ञानोबा अगदी आपल्या रसाळ, मधुर भाषेत सांगतात,

 

तो हळुहळू ढाळेढाळे | केतुलेनि एके वेळे| मार्गाचेनि बळे| निश्चित ठाकी ||४२||

 

इथ’ ‘जे निश्चित ठाकायच बळ’ आहे, ते ‘त्या मार्गाचच’ (मार्गाचेनि बळे) आहे, हे लक्षात घेण्यासारख आहे. तो मार्ग मिळायचा कसा, यातच खरी ‘गोम’ आहे. आणि समजा पुर्वसुकृताने मार्ग मिळालाच, तर हळुहळू ढाळेढाळे, म्हणजे जे काही ‘ठाकायच ‘ आहे, ते हळूहळू-क्रमाक्रमानेच होणार हे निश्चित.

 

तोच माउलींचा मार्ग, खाली आला आहे. “मार्गाचेनि बळे| निश्चित ठाकी ||”. किती छान वर्णन केलंय बघा. अगदी आपल्याला डोळ्य़ांसमोर दिसेल की जसा तो मनुष्य झाडाच्या शेंड्याला असलेल्या त्या फळापर्यंत पोहोचण्यासाठी, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर पाय ठेवत, हळुहळू, ढाळे ढाळे, खालच्या फांदीवरुन वरच्या फांदीवर जात, त्या मार्गाच्या सामर्थ्याने, आणि फांदी पक्की असेल तर, त्या फळापर्यंत जाऊन पोहोचतो हे नक्की. दुसऱ्या कुठल्या गोष्टींत स्वारस्य असण्याचे कारणच नाही. मी इथे का आहे, माझे आस्तित्व का आहे, मी ग्रुपवर पोस्ट का करतो? तर प्रत्येक वेळी मला श्रीहरीचे स्मरण करायला उद्युक्त करते म्हणून यात मला स्वारस्य आहे. तिचा कुठलाही “वाद” होऊ लागला, दुरुपयोग होऊ लागला, की तिथून आपला मार्ग पकडून वेगळे व्हायचे.

 

अगा सहस्त्रकिरणाचिये दिठी | पुढा चंद्रही लोपे किरीटी | तेथ खद्योत का हुटहुटी | आपुलेनि तेजे ||

– ज्ञानेश्वरी ९.३७९

 

जिथे सूर्याच्या तेजापुढे चंद्रासारखा दिव्यगोलसुद्धा लोप पावतो. जिथे वेदसुद्धा “न इति न इति” म्हणून थांबतात, तिथे त्या परमात्म्याच्या ज्ञानप्रकाशापुढे माझ्यासारख्या काजव्याने आपल्या प्रकाशाच्या बळावर वळ्वळ का करावी?

 

समर्थ रामदास स्वामी सगुण्-निर्गुण भक्तीची दोन सुत्रे सांगितली आहेत,

 

१) सगुणाचेनि आधारे | निर्गुण पाविजे निर्धारे ||

श्रीकृष्णांनी भगवदगीतेत सांगितलेल आहे “संत माझ्या सजीव प्रतिमा”. तसेच श्री ज्ञानदेवांनीही ज्ञानेश्वरीत आम्ही भावंडे ‘मूर्तीचा मेळावा’ करुन अवतरलो आहोत अशी नोंद केली आहे.

 

२) सगुण रक्षावे, निर्गुण बोलावे…

सगुण भक्ती ते चळे | निर्गुण भक्ती ते न चळे | हे आवघे प्रांजळ कळे | सदगुरु केलिया ||

– श्रीमत् दासबोध, नवविधा भक्तिनाम दशक चवथा, समास दहावा-मुक्तिचतुष्टय, ओवी ३१

 

हे सांगताना निर्गुण देवाच्या दर्शनाची सातत्यता इथे प्रगट केली गेली आहे. पण त्यासाठी ‘सदगुरु केलिया’ ही गोष्ट महत्वाची, हेही स्पष्ट केले आहे.

 

सदगुरुवचन हृदयी धरी | तोचि मोक्षाचा अधिकारी | श्रवण्-मनन केलेचि करी | अत्यादरे ||

 

सदगुरु वाचन, अनुग्रह, देवा बद्दलचे उत्तम ज्ञान आणी साधन यानेच इप्सित सध्या होते, मोक्ष प्राप्ती होते. इथेही ‘सदगुरुक्षूनि’च (निक्षूनिच) ध्यानक्रिया करावी, हे सांगितले आहे. ‘सदवस्तू दाखवी सदगुरु’ हेच खरे असून श्री रामदासस्वामींनी सदगुरुरुप सगुणावताराकडूनच सदवस्तू वरुन निर्गुणाचा अनुभव येईल हे सांगितले आहे. एका ओवीत काय काय सांगितल आहे पहा, ‘वचन सदगुरुनींच दिलेल’ असले पाहिजे, घेतलेल नाही. म्हणजे पात्रतेनुसार मिळण आल, स्वत:च डोक चालवायचं, किंवा खाजवायचं नाही. ज्याला ते वचन मिळाल आहे त्याने,

 

ते हृदयी धरायला पाहीजे,

त्याच श्रवण् केलच पाहीजे,

त्याचच मननही केलच पाहीजे (कारण केलेचि करी),

ते पण कसं तर ‘अतिशय आदराने, प्रेमाने’

अस जो करतो, “तोच मोक्षाचा अधिकारी”

 

शेवट करताना गदिमांच्या या सुंदर गीताचा आस्वाद घेऊ यात,

 

निजरूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो

अवरुद्ध साद माझा प्रतिसाद त्यास द्या हो

आला गजेंद्र मोक्षा तैसे पुनश्च या हो

जळत्या निळ्या वीजेची प्रभू एक झेप घ्या हो

नरसिंह होवुनीया घुमवीत गर्जनासी

शतसूर्य तेज दावा अज्ञात या जनासी

भ्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र व्हा हो

पार्थास दाविले ते प्रभू विश्वरूप दावा

मुरली मनोहरा या व्हा वाजवीत पावा

एका करांगुलीने गोवर्धना धरा हो

राज:भ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एकवार

श्रीकृष्ण-विष्णू-राम तोचि विठू महार

जाळी तनामनासी ती आग शांतवा हो

 

 

अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त

श्रीगुरुचरणरजानंदसेवक

श्रीकृष्ण वसंत पुराणिक

(१० फेब्रुवारी २०१७)